इस्लामाबाद, २९ सप्टेंबर २०२२ : पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात (PFI) ही संघटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. या संघटनेवर आता केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातला अध्यादेशही जारी केला असून तपास यंत्रणांच्या शिफारसीवर केंद्रिय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. तर यानंतर आता PFI संस्थेचा पाकिस्तानला पुळका आल्याचं समोर आलं आहे.
२२ सप्टेंबर रोजी NIA राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि तसंच अंमलबजावणी संचालनालयान ED अशा तपास यंत्रणांनी संयुक्तपणे पीएफआयवर कारवाई केली. या संघटनेशी संबंधित १०६ लोकांना या पहिल्या फेरीमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या गोष्टींच्या आधारे दुसऱ्या फेरीत जवळपास २४७ लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. PFIचं उद्दिष्ट सरकारी संस्था, नेते, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्या संघटनेला लक्ष्य करण्याचा विचार करत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय त्यांच्या टार्गेटवर असल्याचं तपासातून समोर आलं आहे. त्याचबरोबर मुस्लीम तरूणांची माते भडकावण्याचे काम या संस्थेकडून होत असल्याची माहिती संबंधित आरोपींनी दिली आहे.
भारताने PFI या संघटनेवर बंदी घातल्यामुळे पाकिस्तानने याला विरोध केला आहे तर हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेण्याचा त्यांचा डाव असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकारने केलेल्या कारवाईची माहिती PFI ने आपल्या ट्वीटरवरून दिली होती. त्यानंतर हे ट्वीट पाकिस्तानच्या कॉन्सुलेट जनरलने संयुक्त राष्ट्राच्या अधिकृत ट्वीटरला टॅग करून रिट्वीट केले आहे.
त्यामुळे PFIचा पाकिस्तानला एवढा पुळका का येतो असा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्याकडून हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेण्याचा डाव आहे. तर आता PFI च्या ट्वीटर अकाऊंटवरही केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या बंदीनंतर एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. तर RSS वरही बंदी घाला अशी मागणी काँग्रेसकडून आणि अनेक नेत्यांकडून करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे