फिलीपिन्स भारताकडून खरेदी करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र, 2770 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

नवी दिल्ली, 17 जानेवारी 2022: ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. ते ध्वनीच्या तिप्पट वेगानं लक्ष्यापर्यंत पोहोचतं. ते 290 किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकतं.

चीनला घेरण्यासाठी भारताने मोठी योजना तयार केली आहे. देशाने सर्वात वेगवान सुपरसोनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसचं जाळे टाकण्यास सुरुवात केलीय. यासाठी भारताने ड्रॅगनचा शत्रू देश फिलिपाईन्सला ब्राह्मोसची निर्यात करण्यासाठी $375 दशलक्ष (2789 कोटी रुपये) चा करार केलाय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिलिपाइन्सच्या राष्ट्रीय संरक्षण विभागानं ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडला ‘नोटिस ऑफ अवॉर्ड’ जारी केलं आहे, ज्या अंतर्गत पुढील आठवड्यापर्यंत दोन्ही देशांमधील करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. या करारामुळं चीनला मोठा झटका बसला आहे. दक्षिण चीन समुद्रावरील हक्कावरून फिलिपिन्सचा चीनशी वाद सुरू आहे. अहवालानुसार, अशा परिस्थितीत फिलिपिन्स आपल्या किनारी भागात ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करू शकतं.

ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा हा पहिला करार

ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या निर्यातीचा हा पहिला करार आहे. यामुळं इंडोनेशिया आणि व्हिएतनाम सारख्या आशियाई देशांसोबत क्षेपणास्त्र व्यवहाराचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हा करार चीनच्या वाढत्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी तसेच दक्षिण चीन समुद्रात त्याच्या शेजारी राष्ट्रांसोबत मजबूत धोरण प्रस्थापित करण्यासाठी एक राजकीय आणि राजनयिक चाल आहे.

काय आहे ब्रह्मोस क्षेपणास्त्र?

ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. ते मॅक 218 वर लक्ष्यापर्यंत पोहोचतं, जे आवाजाच्या वेगापेक्षा तिप्पट आहे. ते 290 किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकतं. भारतीय सशस्त्र दलाने गेल्या काही वर्षांत ब्रह्मोससाठी 36,000 कोटी रुपयांच्या ऑर्डर दिल्या आहेत.

भारताने आपल्या शेजारी ड्रॅगनच्या वाढत्या आक्रमक वृत्तीमुळं लडाख आणि अरुणाचल प्रदेशसह नियंत्रण रेषेव्यतिरिक्त अनेक ठिकाणी ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आधीच तैनात केली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा