पुणे, ३० ऑक्टोबर २०२२: नोटांवरच्या फोटोंवरून सध्या राजकारण शिगेला पोहोचले आहे. नोटांवर कोणाला हवेत देवाचे फोटो तर कोणाला हवेत शिवाजी महाराज, लक्ष्मी देवी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो. सध्या सुरू असलेल्या वादावरून फक्त देशभरातच नाही तर महाराष्ट्रातही राजकारण जोरात सुरु आहे.
‘वेगवेगळया नेत्यांनी केली वेगवेगळया फोटोंची मागणी’
पाडव्याच्या दिवशी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सगळ्यात आधी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो असावा, अशी मागणी केली. मग अन्य पक्ष गप्प तरी कसे बसतील ? आणि मग सुरु झाले नोटा, फोटो आणि राजकारण…
यामध्ये वीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांच्या सह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो ची मागणी करण्यात आली आहे. मात्र खरा प्रश्न आहे आता नोटेवर असणारा गांधींचा फोटो कुठला आहे.
‘भारतीय नोटांचा इतिहास’
भारताच्या चलनी नोटा कोण छापतं आणि त्याची प्रक्रिया काय असते, याची माहिती घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नोटांचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. यासोबतच नोटांवर छापलेल्या चित्रांमुळे परदेशात ही आपण आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवितो.
नोटांवर महात्मा गांधी कधी आले?
सध्या भारतीय चलनी नोटांवर समोरील बाजूस महात्मा गांधी यांचा फोटो दिसतो. पण आपल्या नोटांवर गांधीजींचा फोटो पूर्वी नव्हता, बर का….
खरे तर,१९४७ साली स्वातंत्र्य मिळालं, पण नोटांवर गांधीजींचा फोटो हा महात्मा गांधींच्या शंभराव्या जन्मदिवसाच्या निमित्ताने १९६९ मध्ये पहिल्यांदा चलनी नोटेवर महात्मा गांधीजींचा फोटो छापण्यात आला. यामधले गांधीजी बसलेले होते आणि मागे सेवाग्राम आश्रम होता. आणि त्यापूर्वी नोटेवर ब्रिटनच्या राजाचा फोटो होता.
भारतात १, २, ५, १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. भारतात ऐतिहासिक म्हणता येईल अशी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी नोटबंदी घोषित करण्यात आली. त्यानंतर जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करून नवीन ५०० व २००० रुपयांच्या नोटा आणण्यात आल्या आहेत.
केजरीवालांच्या ‘या’ मागणीवर सर्वेक्षण केले असता, धक्कादायक निकालसमोर
एबीपीच्या सी व्होटर सर्व्हेमध्ये गुजरातमधील १४२५ आणि हिमाचल प्रदेशातील १३६१ लोकांना विचारण्यात आले की, नोटेवर लक्ष्मी-गणेशाच्या चित्राची मागणी योग्य आहे का? याला उत्तर देताना ४५ टक्के लोकांनी होय असे म्हणत नोटेवर लक्ष्मी-गणेशाचे चित्र लावण्याची अरविंद केजरीवाल यांची मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी अरविंद केजरीवाल यांची ही मागणी योग्य नसल्याचे ५५ टक्के लोकांचे म्हणणे आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या या सूचनेनंतर एकामागून एक अनेक दिग्गज नेत्यांचे फोटो लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे त्याचवेळी अनेक हिंदू संघटनांनी त्यांच्या मागणीला विरोध केला असून भाजपनेही या मागणीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील आगामी निवडणुका लक्षात घेता ‘आप’चा हिंदुविरोधी चेहरा लपवण्याचा हा अयशस्वी प्रयत्न असल्याचे भाजपने म्हटले आहे.
सामान्य माणसाचे हाल !
या सर्व गदारोळात सामान्य माणसाचे मात्र हाल होत आहेत. देशात अर्थव्यवस्थेची गती, महागाई, अतिवृष्टी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे प्रश्न एकीकडे आहेत. शिवाय, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरू असताना चलनी नोटांवर कोणाचा फोटो लावावा, यावर किस पाडला जात आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य जनतेच्या समस्यांकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे, असे एकंदरीत चित्र दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक