Phule film release without cuts: महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘फुले’ चित्रपटाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय सिंह यांनी कठोर भूमिका घेतली आहे. “हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत, कोणतीही काटछाट न करता प्रदर्शित झाला पाहिजे,” असे स्पष्ट मत त्यांनी आज पुणे येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.
आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संजय सिंह यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. शांतता आणि खंबीरपणे पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवावी. फुले दाम्पत्याचे कार्य आणि त्यांचे विचार आजही समाजाला योग्य दिशा दाखवणारे आहेत. त्यांच्या जीवनगाथेवर आधारित चित्रपटाला विरोध करणे म्हणजे दलित, दुर्बळ आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अपमान आहे, असे ते म्हणाले.
काही संघटनांनी चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. ब्राह्मण समाजाचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप करत या संघटनांनी प्रदर्शनात अडचणी निर्माण केल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय सिंह म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सप्ताह देशभर साजरा होत असताना, ‘फुले’ चित्रपटाला विरोध होणे अत्यंत दुर्दैवी आणि दलित समाजाच्या भावनांना ठेच पोहोचवणारे आहे.”यावेळी संजय सिंह यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. ‘वक्फ (सुधारणा) विधेयक २०२५’ चा उल्लेख करत ते म्हणाले की, हे विधेयक धार्मिक संस्थांच्या जमिनी हडपण्यासाठी आणले जात आहे. याचा थेट फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भांडवलदार मित्रांना होणार आहे, असा आरोप त्यांनी केला.
या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अजित फाटके, उपाध्यक्ष विजय कुंभार, पक्षाचे सचिव अभिजीत मोरे, राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्यासह धनंजय बनकर, किरण कद्रे, अमित म्हस्के, सुनिता काळे, माधुरी गायकवाड आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी,सोनाली तांबे