पुणे,४ जानेवारी २०२३ : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ वा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात ‘पिफ’ यंदा २ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे. या महोत्सवात यंदा जगभरातील १४० दर्जेदार चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली. याप्रसंगी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे आणि चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते उपस्थित होते.
महोत्सवासाठी यंदा ७२ देशांमधून १ हजार ५७४ चित्रपट आले असून त्यापैकी १४० चित्रपट दाखविले जाणार आहेत. पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन येथील सहा स्क्रीन्स, कॅम्प परिसरातील आयनॉक्समधील दोन स्क्रीन्स आणि राष्ट्रीय फिल्म संग्रहालय येथील एक स्क्रीन, या तीन स्थळी महोत्सवातील चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. यावर्षी महोत्सव केवळ चित्रपटगृहात होणार असून महोत्सवाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया गुरुवारपासून (ता. ५) www.piffindia.com या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे. तर चित्रपटगृहांबाहेरील स्पॉट नोंदणी प्रक्रिया १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे, असे डॉ. पटेल यांनी सांगितले.
- ‘जी२०’मुळे महोत्सव पुढे गेला
‘जी२०’मुळे महोत्सव पुढे ढकललायापूर्वी १२ ते १९ जानेवारी या कालावधीत महोत्सवाचे नियोजन केले होते. मात्र, याच काळात पुण्यात ‘जी२०’ परिषद होत आहे. ‘पिफ’मधील बहुतांश चित्रपटांचे प्रदर्शन पॅव्हेलियन मॉलमध्ये होणार असल्याने वाहतुकीचा ताण वाढू नये, म्हणून प्रशासनाने महोत्सव पुढे ढकलण्याची विनंती केली. या विनंतीचा स्वीकार करून महोत्सव पुढे ढकलला. तसेच, महोत्सवासाठी सरकारने चार कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याचे आश्वासन दिले असून त्यापैकी काही रक्कम मिळाली आहे. उर्वरित निधीही लवकरच मिळेल, असेही डॉ. जब्बार पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘पिफ’ हा महाराष्ट्र सरकारचा अधिकृत महोत्सव असल्याने आम्ही त्यासाठी आर्थिक मदतीसह इतरही सर्व प्रकारची मदत करणार आहेत, असे आश्वासन डॉ. ढाकणे यांनी दिले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.