पिकेंनी नाकारली सोनियांची ऑफर, म्हणाले… काँग्रेसला माझी नाही तर चांगल्या लीडरशिपची गरज

नवी दिल्ली, 27 एप्रिल 2022: अखेर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये येण्यास नकार दिला. गेल्या 15 दिवसांपासून प्रशांत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. प्रशांत यांनीच यावर पूर्णविराम लावला आणि काँग्रेसला माझी नव्हे तर चांगलं नेतृत्व आणि व्यापक बदलाची गरज असल्याचं सांगितलं.

याआधी प्रशांत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 600 पानी प्रेझेंटेशन दंले. त्यानंतर सोनियांनी पीके यांचा पक्षात समावेश करण्याबाबत 8 सदस्यीय समितीकडून सल्ला मागितला होता. समितीने प्रशांत यांना काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी इतरांची साथ सोडण्यास सांगितलं होतं.

मंगळवारी, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केलौ – काँग्रेस अध्यक्षांनी एक सक्षम कृती गट 2024 स्थापन केला आणि प्रशांत किशोर यांना गटात सामील होण्यासाठी आमंत्रित केलं, परंतु त्यांनी नकार दिला. त्यांनी पक्षासाठी केलेल्या प्रयत्नांचे आणि सूचनांचे आम्ही कौतुक करतो.

पीके म्हणाले- काँग्रेसला माझी गरज नाही

सुरजेवाला यांच्या वक्तव्यानंतर खुद्द पीके यांनीच आपण काँग्रेसमध्ये सामील होत नसल्याचं स्पष्ट केले. प्रशांत यांनी लिहिलं- मी काँग्रेसचा ईएजी (एम्पॉर्ड अ‍ॅक्शन ग्रुप) भाग होण्याचा, पक्षात सामील होण्याचा आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची ऑफर नाकारली आहे. माझ्या मते, पक्षातील अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसला माझ्यापेक्षा जास्त नेतृत्व आणि प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे.

6 समित्या स्थापन करण्यात आल्या

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सोमवारी सांगितले होते की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काय धोरण असेल हे एम्पॉर्ड अॅक्शन ग्रुप ठरवेल. 10 जनपथ येथे सोमवारी झालेल्या बैठकीत काँग्रेसने भविष्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला, त्याअंतर्गत 6 नवीन समित्या स्थापन करण्यात आल्या.

मल्लिकार्जुन खर्गे, सलमान खुर्शीद, पी चिदंबरम, मुकुल वासनिक, भूपिंदर सिंग हुडा आणि अमरिंदर सिंग वारिंग हे या सर्व समित्यांचे स्वतंत्र निमंत्रक म्हणून काम पाहतील.

सोनिया गांधी यांनी प्रशांत यांच्या प्रेझेंटेशन आणि त्यांचा पक्षात प्रवेश यावर विचार करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल सोनियांना सादर केला. समितीचे सदस्य केसी वेणुगोपाल, दिग्विजय सिंग, अंबिका सोनी, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी 10 जनपथवर जाऊन प्रशांत यांच्यावर निर्णय घेतला.

प्रशांत यांनी इतर सर्व राजकीय पक्षांपासून दूर राहावे आणि नंतर काँग्रेसला पूर्णपणे शरण जावं, अशी समितीची इच्छा होती. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी आणि केसीआरच्या टीआरएस सारख्या प्रादेशिक पक्षांशी काँग्रेसने युती करावी, असं पीके यांनी सुचवलं होतं.

प्रेझेन्टेशन दिल्यानंतर बदलला पीके यांचा निर्णय

पीके यांनी काँग्रेसला दिलेल्या 600 पानी प्रेझेंटेशनमध्ये सत्तेत परतण्यासाठी पक्षाला काय करावे लागेल हे सांगण्यात आलं होतं. त्यांनी तीन सूत्रे दिली. पहिली- काँग्रेसने संपूर्ण देशात एकट्याने निवडणूक लढवावी. दुसरे- भाजप आणि मोदींना पराभूत करण्यासाठी आणि यूपीएला मजबूत करण्यासाठी काँग्रेसने सर्व पक्षांसोबत यावं. तिसरे- काही ठिकाणी काँग्रेस एकट्याने तर काही ठिकाणी मित्रपक्षांसोबत निवडणूक एकत्र लढवावी.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा