पिंपरी-चिंचवड २३ फेब्रुवारी २०२५ : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे अचानक तोडल्याने नागरिकांची, विशेषत महिलांची मोठी गैरसोय होत आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.शहरातील काही भागांमध्ये असलेली सार्वजनिक शौचालये प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता तोडली आहेत. त्यामुळे नागरिकांना उघड्यावर नैसर्गिक विधी करण्याची वेळ आली आहे. महिलांसाठी ही समस्या अधिक गंभीर आहे, कारण त्यांना मासिक पाळीच्या काळातही गैरसोयीचा सामना करावा लागतो.
“मासिक पाळीच्या काळात खूप त्रास होतो. त्यात आता शौचालय नसल्याने खूप अडचणी येतात,” असे एका महिलेने सांगितले.
या समस्येमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी महिलांना बाहेर जाणे धोकादायक बनले आहे. अनेक ठिकाणी सुलभ शौचालये असूनही ती बंद ठेवली जात आहेत, अशी नागरिकांची तक्रार आहे.
“आम्ही कर भरतो, पण आम्हाला मूलभूत सुविधांपासून वंचित का ठेवले जात आहे?” असा सवाल एका नागरिकाने केला.
नागरिकांनी प्रशासनाला तातडीने नवीन शौचालये बांधण्याची किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्तेही या मुद्द्यावर आवाज उठवत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे