पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये नेतृत्वाचा ‘महासंग्राम’; जुना की नवा चेहरा, प्रदेश समितीच्या बैठकीकडे लक्ष!

17
Pimpri-Chinchwad BJP leadership battle: पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) शहराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
भाजपमध्ये नेतृत्वाचा 'महासंग्राम';

Pimpri-Chinchwad BJP leadership battle: पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) शहराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. विद्यमान शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांचा कार्यकाळ संपल्याने, या पदासाठी २६ प्रमुख नेत्यांनी गुप्त मतदान केले आहे. या मतदानामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात नवा वाद उफाळून आला आहे. शहराध्यक्षपदी जुना कार्यकर्ता हवा की नवा, खुला वर्ग की ओबीसी, यावरून जोरदार चर्चा रंगली आहे.

या पदावर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी मुंबईतील नेत्यांपर्यंत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर राहुल जाधव, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, भाजप युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष अनुप मोरे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, संजय मंगोडेकर, भाजपच्या महिला अध्यक्ष सुजाता पलांडे, शैलजा मोळक यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.

प्रदेश समितीची २ मे रोजी बैठक होणार असून, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या रविवार किंवा सोमवारपर्यंत नवीन शहराध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरवासीयांचे लक्ष या घोषणेकडे लागले आहे.

शहरातील प्रमुख पदे स्थानिक नेत्यांकडे असल्याने, आता राज्याच्या विविध भागांतून आलेल्या निष्ठावंतांना संधी मिळावी, अशी मागणी होत आहे. शहरात भाजपचे चार आमदार असल्याने, ते कोणाचे नाव सुचवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. आमदार जगताप यांनाच पुन्हा संधी मिळावी, असा एका गटाचा आग्रह आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे