परिवहन विभागाच्या जाचक अटींविरोधात बस मालक आक्रमक; आंदोलनाचा इशारा!

Pimpri Chinchwad Bus Owners Protest VLT SLTD
बस मालक आक्रमक;

Pimpri Chinchwad Bus Owners Protest VLT SLTD: परिवहन विभागाच्या जाचक नियमांमुळे त्रस्त झालेल्या पिंपरी-चिंचवड बस ओनर्स असोसिएशनने आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. व्हीएलटीडी (Vehicle Location Tracking Device) आणि एसएलटीडी (Speed Limit Device) प्रणालीच्या सक्तीमुळे वाहतूकदारांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे प्रवासी वाहतूकदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, बुधवारी (दि. २) असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात निवेदन सादर करत आपल्या व्यथा मांडल्या.

असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे, कार्याध्यक्ष दीपक कलापुरे, उपाध्यक्ष भालचंद्र बोराटे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बोराटे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, प्रवासी वाहतूकदार लाखो रुपयांची गुंतवणूक करून प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देतात. यातून सरकारला हजारो कोटींचा महसूल मिळतो आणि मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होतात. असे असतानाही परिवहन विभागाच्या जाचक अटींमुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे.

विशेषतः व्हीएलटीडी आणि एसएलटीडी प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे मोठा फटका बसत असल्याचा दावा वाहतूकदारांनी केला आहे. दीपक कलापुरे यांनी स्पष्ट केले की, २०१९ पासून सर्व प्रवासी वाहनांमध्ये या प्रणाली बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी वाहतूकदारांनी शासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडून हजारो रुपये खर्च करून ही यंत्रणा बसवून घेतली. मात्र, आता हे ठेकेदार अपडेट्स देत नाहीत, काहींनी तर व्यवसायच बंद केले आहेत.

त्यामुळे ही यंत्रणा असूनही तिचा उपयोग होत नाही आणि उलट देखभाल दुरुस्तीसाठी अधिक खर्च करावा लागतो. ठेकेदारांच्या या मनमानी कारभारावर नियंत्रण आणण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.

पिंपरी-चिंचवड बस ओनर्स असोसिएशनने परिवहन विभागाला ठेकेदारांच्या मनमानीवर तातडीने लक्ष देण्याची आणि वाहतूकदारांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, यामुळेच प्रवासी वाहतूक व्यवसायाला पुन्हा चालना मिळेल आणि प्रवाशांना सुरक्षित व अखंडित सेवा मिळेल. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही असोसिएशनने दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे