पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; इच्छुक उमेदवारांच्या संपर्क कार्यालयांची धूम!

10
Pimpri Chinchwad civic election
PCMC इच्छुक उमेदवारांच्या संपर्क कार्यालयांची धूम!

Pimpri Chinchwad civic election 2025: पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरातील चौकाचौकांत संपर्क कार्यालयांची रेलचेल दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून शांत बसलेले इच्छुक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर सोशल मीडियावर ‘गुड मॉर्निंग’ आणि ‘नमस्कार’ संदेशांची पुन्हा सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परता दर्शवली आहे. शहरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावून ‘मीच भावी नगरसेवक’ असा संदेश ते देत आहेत.इच्छुकांच्या सक्रियतेमुळे विद्यमान नगरसेवकांच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट जाणवत आहे. तरुण कार्यकर्त्यांची फौज इच्छुकांच्या मागे असल्याने विद्यमान नगरसेवकांच्या कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची कमतरता भासत आहे. चार सदस्यीय प्रभाग असण्याची शक्यता असल्याने प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे. एका जागेसाठी दोन-दोन इच्छुक असल्याने संपर्क कार्यालयांची संख्या वाढली आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांत नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना आता अचानक संपर्क कार्यालयांची आठवण झाली आहे. शहरातील मोक्याच्या जागांवर ही कार्यालये उभारण्यात आली आहेत. संपर्क कार्यालयांवर मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. महागडी भाडी, उच्च दर्जाचे फर्निचर, कर्मचारी आणि आधुनिक सुविधांवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत.प्रत्येक इच्छुक उमेदवाराला आपली उमेदवारी निश्चित असल्याचा विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी थेट संपर्क कार्यालये थाटण्यापर्यंत मजल मारली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर बंधने येणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे