पिंपरी पालिकेत ‘दालन’ वाद पेटला: अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यावर ‘कब्ज्या’चा आरोप!

Pimpri Chinchwad Civic Office Controversy
पिंपरी पालिकेत 'दालन' वाद पेटला: अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यावर 'कब्ज्या'चा आरोप!

Pimpri Chinchwad Civic Office Controversy: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या नूतन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या ‘दालन’ निवडीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. पालिकेच्या कायदा विभागाच्या कार्यालयावर त्यांनी ‘कब्जा’ केल्याचा आरोप होत आहे, ज्यामुळे कर्मचारी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. यापूर्वी, पदभार स्वीकारताच त्यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या तिसऱ्या मजल्यावरील दालनावरही ‘अतिक्रमण’ केल्याचा प्रकार घडला होता.

वास्तविक पाहता, महापालिकेत अतिरिक्त आयुक्त क्रमांक एक आणि दोन ही दोन पदे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर भरली जातात. तर, अतिरिक्त आयुक्त क्रमांक तीनचे पद पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकाऱ्यांसाठी पदोन्नतीद्वारे आरक्षित आहे. मात्र, या एकमेव आरक्षित जागेवरही शासनाने सांडभोर यांची प्रतिनियुक्तीवर नेमणूक केली आहे. या विरोधाला न जुमानता महापालिका आयुक्तांनी त्यांना रुजू करून घेतल्याने कर्मचारी महासंघाने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

महापालिकेत कोणत्या अधिकाऱ्याला कोणते दालन द्यायचे, यासाठी आयुक्त अध्यक्ष असलेल्या एका दालन समितीची नेमणूक करण्यात आली आहे. या समितीमध्ये शहर अभियंता, प्रशासन विभाग प्रमुख, आणि मुख्य लेखा व वित्त विभाग प्रमुख हे सदस्य आहेत. मागील वर्षीही मुख्य अभियंता आणि सहशहर अभियंता यांच्या दालनाचा वाद आयुक्त शेखर सिंह यांच्यापर्यंत पोहोचला होता, त्यानंतर स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांना दालन वाटप करण्यात आले होते. आता तसाच प्रकार घडल्याने समिती यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणी शहर अभियंता मकरंद निकम यांनी, “अतिरिक्त आयुक्तांनी कोणते दालन घ्यायचे, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, दालन समितीने नेमून दिलेल्या दालनाचाच वापर करणे त्यांना क्रमप्राप्त आहे. समितीकडे हा विषय आल्यावर त्यावर निर्णय देण्यात येईल,” असे स्पष्ट केले आहे. या ‘दालन’ वादावर तोडगा कधी निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे