Pimpri Chinchwad Cyber Fraud: उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील कंपन्या आता सायबर चोरट्यांच्या रडारवर आल्या आहेत. सायबर गुन्हेगार कंपन्यांना बनावट ईमेलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालत आहेत. विशेष म्हणजे, फसवणुकीतून मिळवलेला हा पैसा चीनमधील बँकांमध्ये वळवला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी शहरातील कंपन्या आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरटे कंपन्यांच्या ईमेल आयडीमध्ये सूक्ष्म बदल करून कर्मचाऱ्यांशी संपर्क साधतात. स्वतःला कंपनीच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवून ते गुंतवणुकीच्या नावाखाली किंवा तातडीच्या पेमेंटच्या नावाखाली पैशांची मागणी करतात. अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या असलेले ईमेल आणि दस्तावेज पाठवून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला जातो. यानंतर, त्यांना परदेशातील वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे पाठवण्यास सांगितले जाते. विशेष बाब म्हणजे, हे सर्व व्यवहार अत्यंत गोपनीय ठेवण्याचे आणि याबाबत कोणालाही माहिती न देण्याचेही फर्मान सोडले जाते.
या सायबर चोरट्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. नुकतेच एका प्रकरणात चोरट्यांनी एका कंपनीच्या अधिकाऱ्याला तब्बल ७ कोटी १६ लाख ४३ हजार ३६ रुपये चीनमधील बँकेत पाठवण्यास भाग पाडले. याप्रकरणी २३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
या गुन्ह्यांमध्ये सायबर चोरट्यांनी फ्रान्स आणि जर्मनी येथील फोन क्रमांकांचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच, ज्या बँकेत पैसे पाठवण्यास सांगितले, ती बँक चीनमधील आहे. यामुळे या आंतरराष्ट्रीय टोळीचे पाळेमुळे चीनमध्ये आहेत का, याचा कसून शोध पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस घेत आहेत.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी नागरिकांना आणि कंपनी कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, फसवणुकीचा कोणताही प्रकार लक्षात आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी. तसेच, www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर किंवा १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले.
या घटनांमुळे उद्योगनगरीतील कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सायबर चोरट्यांच्या या नवीन कार्यपद्धतीमुळे कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे, कंपन्यांनी आपल्या सायबर सुरक्षा प्रणालीचे कठोर परीक्षण करणे आणि कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे