पिंपरी-चिंचवड शहरात २१०० मतदान केंद्रे; मनुष्यबळ आणि तयारीला वेग
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची (PCMC) निवडणूक नऊ वर्षांनंतर अखेरीस जवळ येत असल्याने निवडणूक विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. डिसेंबर अखेरीस निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने, प्रशासनाने निवडणुकीच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या १५,००० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाची तयारी करण्यावर भर दिला आहे.
२१०० मतदान केंद्रे, १२,६०० मुख्य कर्मचारी
शहरात निवडणुकीसाठी एकूण २१०० मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. प्रत्येक केंद्रावर सुरळीत आणि पारदर्शक मतदानासाठी मनुष्यबळ नियुक्त केले जाईल. या मनुष्यबळामध्ये एक केंद्र प्रमुख, चार कर्मचारी आणि सुरक्षेसाठी एक वर्ग चारचा कर्मचारी यांचा समावेश असेल. म्हणजेच, २१०० केंद्रांसाठी एकूण १२,६०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे.
याशिवाय, २० टक्के कर्मचारी राखीव ठेवले जातील, ज्यामुळे एकूण सुमारे १५,००० अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या प्रक्रियेत सक्रिय असतील. महापालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर यांनी माहिती दिली की, आतापर्यंत विविध सेलनुसार ३०१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि उर्वरित मनुष्यबळाचे नियोजन केले जात आहे.
उपजिल्हाधिकारी स्तरावरील ११ अधिकाऱ्यांची नियुक्ती
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या ११ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे महापालिकेचे ३ प्रभाग सोपवले जातील आणि त्यांच्या कार्यालयात २५ ते ३० कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत असेल. याव्यतिरिक्त, महापालिकेच्या अधिकाऱ्यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक होणार आहे.
निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना निश्चित झाली असून, आता पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांनुसार मतदारयाद्या फोडण्याच्या (विभाजित करण्याच्या) कामाला सुरुवात झाली आहे. यानंतर हरकती व सूचना मागवून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता आणि नियोजनाची आखणी युद्धपातळीवर सुरू आहे, ज्यामुळे माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे













































