आरक्षणाची लॉटरी पिंपरी-चिंचवडच्या राजकीय ‘गेम चेंजर’ची तारीख ठरली!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुचर्चित निवडणुकीचे वारे आता खऱ्या अर्थाने वाहू लागले आहेत! प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर, आता ‘आरक्षण सोडत’ (Reservation Draw) ही राजकीय लॉटरी कधी निघणार, याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, येत्या मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम पार पडणार आहे.

उत्सुकता शिगेला! प्रभागाचे नशीब ठरणार ‘या’ दिवशी

महापालिकेच्या एकूण ३२ चार सदस्यीय प्रभागांतील १२८ जागांसाठी आरक्षण निश्चित होणार आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास वर्ग (OBC) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खुल्या गटातील महिलांसाठीच्या जागांची सोडत या दिवशी जाहीर होईल.

त्यामुळे कोणत्या प्रभागातून कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक विद्यमान नगरसेवक आणि निवडणुकीसाठी तयारी करणारे भावी उमेदवार आता ११ नोव्हेंबरच्या ‘महा निकाला’कडे डोळे लावून बसले आहेत!

न्यायालयीन अडथळा नाही!

प्रभागरचना नियमबाह्य असल्याचा आरोप करत काही नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी, प्रशासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. “न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेस स्थगिती दिलेली नाही,” असे स्पष्ट करत अधिकाऱ्यांनी सोडत प्रक्रिया थांबणार नसल्याचे ठामपणे सांगितले आहे.

याचा अर्थ असा की, न्यायप्रविष्ट बाबींचा परिणाम न होता, पिंपरी-चिंचवडमधील १२८ जागांचे राजकीय भविष्य ११ नोव्हेंबरला निश्चित होणार आहे. ही सोडत शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकणारा ‘गेम चेंजर’ ठरणार आहे, यात शंका नाही!

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे