पिंपरी-चिंचवड शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) धारकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे! अखेर, महापालिकेने शहरात २२ ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी खासगी संस्थेला ‘ग्रीन सिग्नल‘ दिला आहे. गेल्या तीन वर्षांपासून असलेली ही प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. शहरात २३ लाखांहून अधिक वाहने असून त्यापैकी ५० हजारांहून अधिक ‘ईव्ही‘ आहेत. त्यांच्यासाठी ही सुविधा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या चार्जिंग स्टेशन्सच्या उभारणीसाठी महापालिकेला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. खासगी संस्था जवळपास २० कोटी रुपयांचा खर्च करून ही २२ स्टेशन्स उभारणार आहे. संस्था ग्राहकांकडून प्रतियुनिट १७ रुपये आणि त्यावर सेवा व वस्तू कर (जीएसटी) इतके शुल्क आकारू शकणार आहे. विद्युत शुल्कात वाढ झाल्यास त्यानुसार दरात बदल करण्याची तरतूदही आहे. एका स्टेशनसाठी अंदाजे ६९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
या स्टेशन्सची उभारणी शहरातील २२ महत्त्वाच्या ठिकाणी केली जाणार आहे. यात महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत, वाहतूकनगरी (निगडी), बर्ड व्हॅली, बजाज ऑटो, कुस्ती संकुल भोसरी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, भक्ती-शक्ती निगडी, संत तुकारामनगर मेट्रो स्थानक, ऑटो क्लस्टर आणि प्रमुख उद्याने अशा सार्वजनिक आणि वर्दळीच्या ठिकाणांचा समावेश आहे.
महापालिकेचे सहशहर अभियंता अनिल भालसाकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेखा विभागाकडून प्रस्ताव येताच स्थायी समितीची मंजुरी घेऊन सहा महिन्यांच्या आत ही चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील. या निर्णयामुळे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर शहरात वाढण्यास मोठी मदत होणार असून ‘इव्ही’ वापरकर्त्यांचा प्रवास अधिक सुकर होईल यात शंका नाही!
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































