तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विद्यमान अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे. या महत्त्वाच्या पदासाठी सध्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे. प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे ‘लॉबिंग‘ वाढल्याने या पदाच्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या या शर्यतीत तीन प्रमुख नावे चर्चेत आहेत: मुख्य लेखा-वित्त अधिकारी प्रवीण जैन, माजी सहायक आयुक्त नीलेश देशमुख, आणि ग्रामविकास विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे. या तिघांनीही अतिरिक्त आयुक्तपदासाठी जोरदार ‘फिल्डिंग‘ लावल्याची चर्चा आहे.
पात्रता निकषांवर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, या तिघांपैकी तिघेही शासनाच्या पात्रता निकषांमध्ये पूर्णपणे बसत नाहीत. प्रवीण जैन हे प्रशासकीय पदासाठी अपात्र ठरत असल्याची माहिती आहे. नीलेश देशमुख हे वेतनश्रेणीमध्ये कनिष्ठ असल्यामुळे त्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता कमी आहे. तर, विक्रांत बगाडे यांच्याकडे शहरी प्रशासनाचा अनुभव नसतानाही त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.
राजकीय पाठबळामुळे बगाडेंचे नाव चर्चेत
विक्रांत बगाडे यांचे नाव जोरदार चर्चेत येण्यामागे राजकीय पाठबळ कारणीभूत ठरत आहे. त्यांचे बंधू अजिंक्य बगाडे हे नगरविकास विभागात उपसचिव पदावर असून, त्यांचा प्रशासकीय वर्तुळात प्रभाव आहे.
महत्त्वाचे म्हणजे, २०१९-२०२० मध्ये अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांचे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, आमदार अमित गोरखे यांच्याशी जवळचे संबंध निर्माण झाले. गोरखे यांचे राजकीय बळ आणि प्रशासकीय लॉबिंग या जोरावर बगाडे यांच्या नियुक्तीचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
सध्या महापालिकेचा अतिरिक्त कार्यभार श्रावण हर्डीकर सांभाळत असून, नव्या आयुक्तांची प्रतीक्षा असतानाच, अतिरिक्त आयुक्त पदाच्या या नियुक्तीत होणारा राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय लॉबिंग हा शहरभर चर्चेचा विषय बनला आहे. आता ही महत्त्वाची नियुक्ती केवळ कायदेशीर निकषांवर होते की राजकीय शक्ती बाजी मारते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे











































