पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम प्रभाग रचनेत महत्त्वाचे बदल!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना सोमवारी (दि. ६) सायंकाळी जाहीर करण्यात आली. तब्बल ३१८ हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर ही अंतिम रचना प्रसिद्ध झाली असून, चार प्रभागांच्या सूचना पूर्णपणे स्वीकारत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

२०१७ मधील चार सदस्यीय पद्धतीनुसार ही निवडणूक होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार १७,२७,६९२ लोकसंख्येसाठी रचना निश्चित करण्यात आली असून, महापालिकेत ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवक असतील.

अंतिम आराखड्यात काही प्रभागांची नावे बदलली आहेत, तर दोन प्रभागांच्या हरकती अंशतः स्वीकारल्या गेल्या आहेत.

  • प्रभाग १० (जुने: संभाजीनगर, मोरवाडी) आता “संभाजीनगर, मोरवाडी, अण्णासाहेब मगरनगर, टिपू सुलताननगर” या विस्तृत नावाने ओळखला जाईल.
  • प्रभाग ११ आणि २६ च्या नावांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

भौगोलिकदृष्ट्या काही महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत.

  • चिखली गावठाणातील ताम्हाणे वस्ती आता तळवडे गावठाण, रूपीनगर (प्रभाग १२) मध्ये जोडली गेली आहे.
  • भोसरी, धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत (प्रभाग ६) मधील गावजत्रा मैदान परिसर आता गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण (प्रभाग ७) मध्ये समाविष्ट झाला आहे.

अंतिम रचनेचा आराखडा आणि नकाशे महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आणि प्रभाग कार्यालयात पाहता येतील. मंगळवारपासून हे नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असतील, अशी माहिती सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली.

निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या बदलांमुळे राजकीय समीकरणे पुन्हा नव्याने मांडली जाण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे