गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे ठेकेदारांच्या हलगर्जीमुळे पालिकेची फजिती गणेश विसर्जन व्यवस्थेचा बट्ट्याबोळ, खर्चही चौपट

ठेकेदारांच्या हलगर्जीमुळे पालिकेची फजिती गणेश विसर्जन व्यवस्थेचा बट्ट्याबोळ, खर्चही चौपट

‘गणेशोत्सव’ म्हणजे उत्साह, श्रद्धा आणि भक्तिभावाचा सोहळा. पण पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदा कृत्रिम विसर्जन कुंडांची मोठी हवा केली असली, तरी प्रत्यक्षात या साऱ्या दाव्यांची पोलखोल झाली आहे. ठेकेदारांच्या बेफिकिरीमुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च असूनही संपूर्ण व्यवस्था ढासळली आहे.

गेल्या वर्षी 1.5 कोटींमध्ये झालेले काम यंदा तब्बल 4.5 कोटींवर पोहोचण्याची शक्यता असतानाही, नियोजनाचा पूर्ण अभाव दिसून आला. विसर्जन कुंडांमध्ये मूर्तींचे ढिगारे साचले, कारण त्यांना वेळेवर उचलण्यासाठी मजूरच नव्हते. वाहने उपलब्ध असूनही मजुरांच्या अनुपस्थितीमुळे ती ठप्प उभी राहिली. नियमानुसार प्रत्येक वाहनावर चार मजूर असणे आवश्यक असतानाही, ठेकेदारांनी नियम धाब्यावर बसवले. परिणामी, नागरिकांची गैरसोय, परिसराचे विद्रुपीकरण आणि प्रशासनाची मोठी फजिती झाली.

याहून धक्कादायक बाब म्हणजे, अतिक्रमण आणि उद्यान विभागाची वाहने मूर्ती वाहतुकीसाठी वापरली जात असल्याचे समोर आले असून, दुहेरी उकळपट्टीचे आरोपही होत आहेत. दीड आणि पाच दिवसांच्या विसर्जनावेळी तर सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनाच पुढाकार घेऊन मूर्ती भरण्याचे काम करावे लागले.

महापालिकेने स्पष्ट सूचना देऊनही ठेकेदारांकडून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्चूनही ही दुर्व्यवस्था सुरूच आहे. अखेरीस, प्रश्न असा आहे की – या बेजबाबदार कारभाराला जबाबदार कोण? केवळ कागदोपत्री नियमन पुरेसे नाही; त्यांची कठोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, या भ्रष्ट व्यवस्थेचा काळा डाग केवळ गणेशोत्सवाच्या पावित्र्यावरच नाही, तर महापालिकेच्या प्रतिष्ठेवरही बसत राहील.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version