गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे सामाजिक सलोख्याचा आदर्श! गणेश विसर्जनासाठी मुस्लीम बांधवांनी पुढे ढकलला जुलूस

सामाजिक सलोख्याचा आदर्श! गणेश विसर्जनासाठी मुस्लीम बांधवांनी पुढे ढकलला जुलूस

पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या सुरू असलेला गणेशोत्सव केवळ भक्तिमय वातावरणापुरता मर्यादित नसून, तो सामाजिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरणही ठरत आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याची नवीन गाथा लिहित पिंपरी-चिंचवड जुलूस कमिटीने एक अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून, ईद-ए-मिलाद निमित्त ५ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा पारंपरिक जुलूस पुढे ढकलून ८ सप्टेंबर रोजी काढण्याचे ठरवण्यात आले आहे.

या वर्षी ५ सप्टेंबर रोजी हजरत मोहम्मद पैगंबरांची १५०० वी जयंती म्हणजेच ईद-ए-मिलाद आहे. याच दिवशी शहरात अनेक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकाही निघणार आहेत. दोन्ही समाजांच्या मोठ्या मिरवणुका एकाच दिवशी आल्यास वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेत मुस्लीम बांधवांनी एक पाऊल मागे घेत गणेशोत्सवाला प्राधान्य दिले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील मुस्लीम संघटना आणि उलेमा-मौलाना यांच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे केवळ वाहतूक आणि पोलिसांवरील ताण कमी होणार नाही, तर दोन्ही समाजांमधील बंधुभाव अधिक दृढ होईल. पिंपरी-चिंचवड जुलूस कमिटीचे अध्यक्ष रमजान अत्तार यांनी सांगितले की, शहरात हिंदू-मुस्लीम ऐक्य वाढावे, याच उद्देशाने हा जुलूस रद्द करून गणेशोत्सव संपल्यावर काढण्याचा निर्णय घेतला.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही मुस्लीम बांधवांच्या या सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, चिखली अशा अनेक भागातील मुस्लीम बांधव ईद-ए-मिलादचा जुलूस मोठ्या उत्साहात काढतात. हा जुलूस आता ८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असून, या आदर्शवत निर्णयाने समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version