Pimpri-Chinchwad Green Bond Success: पिंपरी-चिंचवड महापालिकेने हरित कर्जरोखे (ग्रीन बॉण्ड) जारी करून २०० कोटी रुपयांचा विक्रमी निधी यशस्वीरित्या उभारला आहे, ज्यामुळे अशी कामगिरी करणारी राज्यातील पहिली महापालिका होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. बीएसईच्या इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणालीवर खाजगी गुंतवणुकीच्या माध्यमातून हे रोखे वितरित करण्यात आले आणि त्यांना गुंतवणूकदारांकडून उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
या ऐतिहासिक यशाबद्दल अधिक माहिती देताना, महापालिकेने सांगितले की, हरित कर्जरोखे इश्यू सुरु होताच अवघ्या काही मिनिटांत १०० कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला. विशेष म्हणजे, एकूण ५१३ कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्या, म्हणजेच रोख्याला ५.१३ पट अधिक मागणी मिळाली, हे गुंतवणूकदारांच्या प्रचंड विश्वासाचे द्योतक आहे. या हरित कर्जरोखा इश्यूला क्रिसिल आणि केअर या मान्यताप्राप्त पतमापन संस्थांकडून ‘एए’ दर्जा मिळाला आहे, ज्यामुळे त्याची विश्वासार्हता सिद्ध होते.
ए. के. कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडने या इश्यूसाठी व्यवहार सल्लागार आणि मर्चंट बँकर म्हणून मोलाची भूमिका बजावली. या रोख्यांचा कालावधी पाच वर्षांचा असून, त्यासाठी ७.८५ टक्के स्पर्धात्मक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. परतफेडीची हमी सुनिश्चित करण्यासाठी मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे राष्ट्रीयीकृत बँकेत एस्क्रो खाते तयार करण्यात आले आहे. या यशस्वी यशामुळे भारत सरकारकडून २० कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देखील महापालिकेला मिळणार आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबत बोलताना सांगितले की, हरित कर्जरोख्यांतून उभारलेला हा निधी निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प आणि गवळी मठ ते इंद्रायणी नगर चौक दरम्यानचा टेल्को रस्ता विकास प्रकल्प या दोन महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी वापरला जाईल. हे प्रकल्प शाश्वत आणि हवामानानुकूल शहरी विकासाच्या दृष्टिकोनाचा भाग आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने हरित कर्जरोखे इश्यू करताच त्याला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता, शाश्वत भविष्याबद्दल गुंतवणूकदारांचा महापालिकेवर दृढ विश्वास असल्याचे स्पष्ट होते. या निधीमुळे शहरात महत्त्वाचे पर्यावरणपूरक प्रकल्प गतीने राबविणे शक्य होणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे














































