पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, ३९ ठिकाणी झाडे कोसळली!

15
Pimpri Chinchwad Heavy Rain News 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

Pimpri Chinchwad Heavy Rain News 2025: पिंपरी-चिंचवड: गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात ३९ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या, ज्यामुळे अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली आणि जनजीवन विस्कळीत झाले. चिंचवड येथील विसर्जन घाटाजवळील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांची चांगलीच दमछाक झाली, तर दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये पाणी गेल्याने अनेक दुचाकी बंद पडल्या.
सोमवारी दुपारपासूनच शहरात पावसाने हजेरी लावली होती. दुपारी अडीच ते रात्री पावणे नऊ या वेळेत १३ ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. तर मंगळवारी दुपारी पावणेतीन ते सायंकाळी सहाच्या दरम्यान १६ ठिकाणी झाडे कोसळली. या झाडपडीच्या घटनांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नागरिकांनी तक्रारी करताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यातील अडथळे दूर केले आणि वाहतूक सुरळीत केली.

शंभर वर्षांचे जुने झाड कोसळले, तळवडे येथे वाहनांचे नुकसान

काळेवाडी येथील पंचनाय चौकात पहाटेच्या सुमारास शंभर वर्षांहून अधिक जुने असलेले एक महाकाय झाड कोसळले. पहाटेची वेळ असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु दिवसा ही घटना घडली असती तर मोठी हानी झाली असती, असे स्थानिकांनी सांगितले. काळेवाडी गावठाणातील हे झाड पंचनाथ देवस्थानाजवळ असल्याने त्याच्या अनेक आठवणी स्थानिक रहिवाशांच्या मनात कोरलेल्या आहेत.याचबरोबर, तळवडे येथील ज्योतिबानगर परिसरातील पांडुरंग हॉटेलसमोर झाड पडल्याने वाहतूक कोंडी झाली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांचेही यात नुकसान झाले.

पहाटेपासून ऊन-ढगांचा खेळ, दुपारनंतर पावसाचा जोर

सकाळपासून शहरात ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता, ज्यामुळे दिवसभर पिंपरी-चिंचवडवासीय उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, दुपारी तीन-साडेतीन वाजल्यापासून आकाशात काळे ढग जमायला सुरुवात झाली आणि तासाभरातच शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींना सुरुवात झाली. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी प्राधिकरण, तळतळे, काळेवाडी, नेहरूनगर, वल्लभनगर, नाशिक फाटा या परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या तसेच खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची यामुळे मोठी तारांबळ उडाली.

सोमवारी आकुर्डी भाजी मंडई, यशवंतनगर, चाकण, पिंपरी आणि काळेवाडी या ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या होत्या. तर मंगळवारी पिंपरी अशोक थिएटर, स्पाइन रोड, पुष्कराज हौसिंग सोसायटी आकुर्डी, यमुनानगर, चिखली, शाहूनगर, शिवतेजनगर, अजमेरा कॉलनी, निगडी अप्पूघर आणि मोरे वस्ती चिखली या ठिकाणी झाडपडीच्या तक्रारी आल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मदतकार्य हाती घेऊन रस्ते मोकळे केले.

या अचानक आलेल्या पावसामुळे शहरवासीयांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, झाडपडीच्या घटना आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे