नागरिकांनी सतर्क राहा! पिंपरी-चिंचवडमध्ये धो-धो पाऊस, जनजीवन विस्कळीत!

Heavy rain lashes Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये धो-धो पाऊस, जनजीवन विस्कळीत

Heavy rain lashes Pimpri-Chinchwad: गेल्या आठवडाभरापासून पिंपरी-चिंचवड शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सोमवार (दि. २६) आणि मंगळवार (दि. २७) च्या मुसळधार पावसाने तर शहराला पाण्याखालीच नेले आहे. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, नोकरदार आणि बाजारकरूंची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
पवना नदीची पाणी पातळी वाढली, मोरया गोसावी मंदिराला पाणी!

संततधार पावसामुळे पवना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. रावेत बंधारा पूर्ण भरला असून, त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. चिंचवड येथील प्रसिद्ध मोरया गोसावी मंदिराच्या पायरीला पाणी लागले असून, नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.

शहर आणि उपनगरांतील स्थिती

मंगळवारी सकाळच्या सत्रात पावसाचा जोर काहीसा कमी असला, तरी दुपारनंतर तो पुन्हा वाढला आणि सायंकाळपर्यंत रिपरिप सुरूच होती. यामुळे बाजारपेठांमधील वर्दळ घटली होती. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालक, विशेषतः दुचाकीस्वारांना मार्ग काढणे कठीण झाले होते. परिणामी शहरातील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. महापालिकेने ड्रेनेजची स्वच्छता केल्याचा दावा केला असला, तरी पावसाचा जोर जास्त असल्याने मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहत होते. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने सोसायट्यांच्या पार्किंगमध्येही गाड्या पाण्यात उभ्या होत्या.

तापमानात घट, सूर्यदर्शन नाही!

सलग सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील तापमानात मोठी घट झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला ४० अंशांवर गेलेले तापमान गेल्या आठवड्यात जवळपास १० अंशांनी घसरले आहे. मंगळवारी चिंचवडमध्ये कमाल तापमान २४.१ अंश, तर किमान तापमान २२.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या बुधवार (दि. २१) पासून पिंपरी-चिंचवडकरांना सूर्यदर्शन झालेले नाही.

वाहतूक कोंडी आणि शेतकऱ्यांचे हाल

पुणे-मुंबई महामार्गावर, विशेषतः देहूरोड येथील सेंट्रल चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर होत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. येथील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रावेतजवळील वाल्हेकरवाडी येथील बाजरीच्या शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

पवना धरणात पाणीसाठा वाढला

गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे पवना धरणाच्या पाणीपातळीत २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत पवना धरणात २८.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

न्यूज न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे