पिंपरी चिंचवडचे छावणीत रूपांतर; मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी अभूतपूर्व नाकाबंदी!

28
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाच्या लोकार्पणासाठी पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पोलिस बंदोबस्ताची झलक दाखवणारे छायाचित्र – चापेकर वाडा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आगमन आणि चापेकर पुतळा.
पिंपरी चिंचवडचे छावणीत रूपांतर;

Chinchwad turns into High Security Zone: पिंपरी-चिंचवड क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अवघे चिंचवड शहर अक्षरशः छावणीत रूपांतर झाले आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज मंत्र्यांच्या उपस्थितीमुळे शुक्रवारी (दि. १८) होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शहरात ३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, उच्चपदस्थ अधिकारी स्वतः या संपूर्ण व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कमालीची दक्षता घेतली आहे. १७ उंच इमारतींच्या टेरेस आणि बाल्कनी ‘हायजॅक’ करण्यात आल्या असून, तिथून सशस्त्र जवान आणि वायरलेस कम्युनिकेशन यंत्रणेद्वारे प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येत आहे. कोणतीही संशयास्पद बाब त्वरित टिपण्यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ जमिनीवरच नव्हे, तर आकाशातूनही नजर ठेवण्यासाठी ड्रोनच्या वापरास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

या भव्य सुरक्षा व्यवस्थेत स्थानिक पोलिसांच्या मदतीला दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल (QRT), बॉम्बशोध पथक, श्वानपथक, सायबर सुरक्षा युनिट आणि गुप्तचर विभागाचे तज्ञ अधिकारीही सहभागी झाले आहेत. कार्यक्रम स्थळाभोवती झोन तयार करून प्रत्येक सेक्टरसाठी स्वतंत्र पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुरक्षेसोबतच वाहतूक आणि पार्किंगची व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. व्हीआयपी आणि सामान्य पाहुण्यांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर बदल करण्यात आले आहेत. कार्यक्रमस्थळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले असून, नियंत्रण कक्षातून प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर ठेवली जात आहे.

शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित झाली असून, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर कार्यक्रमस्थळावरून सुरक्षितपणे रवाना होईपर्यंत ती कायम राहणार आहे. प्रशासनाच्या या युद्धपातळीवरील तयारीमुळे चिंचवडमधील हा लोकार्पण सोहळा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडेल यात शंका नाही. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे