सावधान! पिंपरी-चिंचवडमध्ये वादळापूर्वी होर्डिंग्जचा धोका; महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड!

30
Hoarding risk before storm in Pimpri Chinchwad
महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड;

Hoarding risk before storm in Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवड शहरात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यांचा धोका वाढत असताना, महापालिकेचा आकाशचिन्ह व परवाना विभाग मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसत आहे. १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत शहरात होर्डिंग्ज लावण्यास बंदी असतानाही, अनेक ठिकाणी नव्याने जाहिरातबाजी सुरू आहे.

होर्डिंगधारकांनी महापालिकेच्या आदेशाला सरळसरळ आव्हान दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, खुद्द महापालिकेच्या इमारतीजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातही हे नियम धाब्यावर बसवून होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी १७ एप्रिल २०२३ रोजी किवळे येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच निष्पाप मजुरांचा बळी गेला होता. या हृदयद्रावक घटनेनंतर महापालिकेने तात्पुरती जाग दाखवत १७४ बेकायदेशीर होर्डिंग्ज हटवले. सध्या शहरात सुमारे १४०० अधिकृत होर्डिंग्ज असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या दबावामुळे अनेकदा अनधिकृत होर्डिंग्ज लागतात आणि त्यांना हटवण्याचे धाडस पालिका अधिकारी दाखवत नाहीत, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी-चिंचवड.

आता पुन्हा एकदा वादळी वाऱ्यांचे सावट असताना, होर्डिंग्ज कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर अशी कोणतीही अप्रिय घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या होर्डिंगधारकांवर आणि डोळेझाक करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

उपायुक्तांनी कारवाईचा इशारा दिला असला, तरी प्रत्यक्षात किती गंभीर दखल घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार तातडीने थांबायला हवा!

न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे