Pimpri-Chinchwad HSC Result 2025 Girls Outperform Boys: पिंपरी-चिंचवड शहराने बारावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा उत्कृष्ट निकालाची नोंद केली आहे. यंदा शहराचा निकाल ९५.८० टक्के लागला असून, नेहमीप्रमाणेच मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात ०.८४ टक्क्यांची किंचित घट झाली असली, तरी शहरातील १८ हजार ८० विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे, ज्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
शहरातून एकूण १८ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात ९९७९ मुलांचा आणि ८८२४ मुलींचा समावेश होता. प्रत्यक्षात १८ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, ज्यामध्ये ९९३३ मुले आणि ८७९२ मुली होत्या. यापैकी ९४८४ मुले आणि ८५९६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. निकालाच्या आकडेवारीनुसार, मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.६४ टक्के, तर मुलींनी ९७.७४ टक्क्यांचा उच्चांक गाठला आहे.
शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही चांगली कामगिरी केली आहे. मावळ तालुक्याचा निकाल ९२.९७ टक्के लागला आहे, तर मुळशी तालुक्याने ९६.८३ टक्क्यांचा लक्षणीय निकाल नोंदवला आहे. विशेष म्हणजे, मावळ तालुक्यातही मुलींनीच बाजी मारली आहे. निकालानंतर सर्वत्र विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले असून, शाळांमध्ये विद्यार्थी एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा देत आहेत.
निकाल जाहीर होण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये रविवारपासूनच होती. सोमवारी दुपारी १ वाजता निकाल हाती येताच, विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सायबर कॅफे आणि मोबाईलवर निकाला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरही आपल्या मित्र-मैत्रिणींना भरभरून शुभेच्छा दिल्या. चिंचवड स्टेशन येथील गेंदीबाई चोपडा हायस्कूलमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे ऑनलाइन निकाल पाहिला आणि यशाचा आनंद साजरा केला. एकूणच, पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक क्षितिजावर मुलींनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने पुन्हा एकदा मानाचे स्थान पटकावले आहे.
न्यूज अनकट,प्रतिनिधी सोनाली तांबे