पिंपरी-चिंचवड अपर तहसीलदार कार्यालयाच्या कडक कारवाईमुळे राज्याच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२५ या दीड वर्षांच्या कालावधीत, कार्यालयाने विविध उपक्रम आणि कारवायांद्वारे शासन खात्यात तब्बल ९९ कोटी ८५ लाख ७० हजार ३९९ रुपयांची विक्रमी रॉयल्टी जमा केली आहे.
अपर तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीवर सख्त आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दीड वर्षात शहरात ३५८ तात्पुरत्या गौणखनिज परवानग्या देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अनधिकृत उत्खननाच्या प्रकरणांवर कारवाई करत १६९ प्रकरणांत ४ कोटी १७ लाख ६ हजार ८६ रुपये दंड आकारण्यात आला आहे, त्यापैकी ८९ लाख ६६ हजार ९९७ रुपयांची रक्कम वसूल झाली आहे.
याव्यतिरिक्त, गौणखनिजाच्या अनधिकृत वाहतुकीत गुंतलेल्या ४८ वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. कार्यालयाने अनधिकृत उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्याचा आपला प्रयत्न अधिक तीव्र केला
असून, त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच शासनाच्या तिजोरीत ९९ कोटींहून अधिक महसूल जमा झाला आहे.
महसूल वाढीचा हा आकडा कार्यालयाच्या कार्यक्षमतेचे आणि अवैध कामांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृढ निश्चयाचे प्रतीक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे













































