पिंपरी-चिंचवडमधील सेंट्रल व्हेइकल वर्कशॉप कर्मचारी सहकारी पतपेढी (म.रा.वि.मं.) चे सभासद निवृत्तीनंतरच्या पेन्शनच्या आधारावर मोठ्या आशेने गुंतवणूक करत होते; मात्र, ४ कोटी ४१ लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. यामुळे ठेवीदार हतबल झाले असून, विश्वासघाताच्या या प्रकरणामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या या पतपेढीचे सुमारे १५० सभासद आहेत. त्यांनी आपल्या भविष्यासाठी, पेन्शनच्या आधारासाठी या संस्थेत मोठ्या विश्वासाने गुंतवणूक केली होती. मात्र, २००७ ते २०२२ या कालावधीतील विशेष लेखापरीक्षणानंतर हा कोट्यवधी रुपयांचा अपहार उघड झाला.
या विश्वासघातामुळे काही ठेवीदार आर्थिक अडचणीत आले असून, दोन ठेवीदारांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती सभासदांनी दिली आहे.
घोटाळ्याप्रकरणी १२ सभासदांनी तक्रार दाखल केली असून, सहकार विभागाने नेमलेल्या विशेष लेखापरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी ५ फेब्रुवारी रोजी उपनिबंधकांना अहवाल सादर केला. अहवालात तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि व्यवस्थापक यांचा गैरव्यवहारात सहभाग असल्याचे स्पष्ट नमूद आहे.
ठेवीदारांनी फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचे ठामपणे सांगितले असून, पोलिसांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आता ठेवीदार संतप्त झाले आहेत. ते विचारत आहेत, “पोलिस गुन्हा कधी दाखल करणार?” या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई व्हावी आणि ठेवीदारांना न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































