पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत रंगतदार लढतीचे संकेत
पिंपरी-चिंचवड महापालिकेची रणधुमाळी लवकरच सुरू होणार असून, राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या या निवडणुकीत राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये ‘स्वबळा’चे वारे जोरदार वाहत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडी (मविआ) मात्र एकजुटीसाठी धडपड करताना दिसत आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे महायुतीतील मोठे खेळाडू राज्यात एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवर त्यांच्यात शीतयुद्ध सुरूच आहे. २०१७ मध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात घुसून भाजपने ७७ जागा जिंकल्या होत्या. याच विजयाच्या आत्मविश्वासातून आगामी निवडणुकीतही भाजप स्वबळावर प्रत्येक प्रभागात पॅनल उतरवण्याची तयारी करत आहे. दुसरीकडे, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीलाही स्वबळावर लढून आपली ताकद दाखवायची आहे. दोन्ही पक्षांना वाटत आहे की, युती केल्यास जागा गमवाव्या लागतील, पण स्वतंत्र लढल्यास सत्ता हातात राहील.
याउलट, महाविकास आघाडीमध्ये (मविआ) मात्र एकीचा सूर दिसून येत आहे. शरद पवार गट, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस एकत्रितपणे लढण्याच्या तयारीत आहेत. विधानसभेतील पराभवानंतर, एकत्र येऊन महापालिकेत किमान ५०-६० जागा जिंकण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. दोन्ही आघाड्यांनी गुप्तपणे सर्वेक्षणे सुरू केली आहेत आणि प्रत्येक प्रभागातील ताकद, सामाजिक समीकरणे आणि मतदारांचा कल याचा अभ्यास केला जात आहे.
एकंदरीत, महायुतीत जागावाटपाचा तिढा आणि स्थानिक पातळीवरील कटुता यामुळे ‘दोस्तांपेक्षा शत्रू बरे’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर, मविआ एकत्र येऊन महायुतीसमोर मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी निवडणूक ही स्थानिक ताकद आणि राजकीय डावपेचांची एक मोठी परीक्षा ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































