पिंपरी १६ सप्टेंबर २०२५ : आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने सुरू केल्याची माहिती शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिली. महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला, तरी भाजपची संघटनात्मक ताकद भक्कम असल्याने सर्व जागांवर उमेदवार उतरवण्याची पक्षाची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रविवारी पिंपळे सौदागर येथे पत्रकारांशी बोलताना काटे यांनी भाजपच्या निवडणूक तयारीची माहिती दिली. २०१७ मध्ये ७७ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. यंदाही ३२ प्रभागांमध्ये प्रत्येकी १२८ उमेदवार उतरवण्याची पक्षाची योजना आहे. प्रत्येक बूथवर दहा कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, शहरभर नागरिकांशी भेटीगाठी सुरू आहेत. काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात पक्षाला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणात ७२ जागांवर विजय निश्चित असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित जागांवर विजय मिळवण्यासाठी पक्ष प्रयत्नशील राहणार आहे.
‘महायुती’तील इतर पक्ष किंवा विरोधी पक्षांमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र, पक्ष प्रवेशाबाबत विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, असेही काटे यांनी सांगितले. सध्या ‘सेवा पंधरावडा’ कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधत भाजप निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज झाली असून, स्वबळावर निवडणूक लढण्याची पक्षाची तयारी मजबूत असल्याचे यातून दिसून येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे
