गोल पोस्ट पिंपरी चिंचवड बातम्या ‘रेशन’ बंद! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन हजार लाभार्थ्यांना धक्का

‘रेशन’ बंद! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन हजार लाभार्थ्यांना धक्का

पिंपरी १६ सप्टेंबर २०२५ : गेल्या सहा महिन्यांपासून रेशनचे धान्य न घेतल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील ३ हजार ९७ शिधापत्रिकाधारकांचे रेशन बंद करण्यात आले आहे. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यानुसार, सलग सहा महिने धान्याची उचल न केल्यास संबंधित शिधापत्रिका निष्क्रिय (deactivate) होते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

याचबरोबर, ई-केवायसी न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही मोठा फटका बसला आहे. ३१ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात १ लाख १२ हजार ६७८ लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. यामध्ये सर्वाधिक ४३ हजार ६६६ अर्ज पिंपरी विभागात प्रलंबित आहेत, तर चिंचवडमध्ये ४१ हजार ७३० आणि भोसरीमध्ये २७ हजार २८२ अर्ज प्रलंबित आहेत. ३१ ऑगस्ट रोजी ई-केवायसीची मुदत संपल्यामुळे, या सर्व लाभार्थ्यांना आता रेशन बंद होण्याची भीती सतावत आहे.

रेशन कार्ड निष्क्रिय झाल्यावर काय करायचे?

जर तुमचे रेशन कार्ड बंद झाले असेल, तर तुम्ही सार्वजनिक वितरण विभागाच्या कार्यालयात जाऊन ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी अर्ज करू शकता. याव्यतिरिक्त, राज्य किंवा केंद्रीय ई-पीडीएस पोर्टलवरही कार्डची स्थिती तपासता येते. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास, गरजू कुटुंबांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे लाभार्थ्यांनी त्वरित कार्यवाही करणे आवश्यक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version