अपुऱ्या सोयी-सुविधांना पुरून उरली पिंपरी उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कामगिरी; शासनाच्या तिजोरीत जमा केले तब्बल २२ कोटींचा महसूल!

16
शासनाच्या तिजोरीत जमा केले तब्बल २२ कोटींचा महसूल;

State Excise Department Record Revenue Collection: जागेची अडचण, अपुरे मनुष्यबळ आणि साध्या खुर्च्यांची वानवा… अशा अनेक अडचणींचा सामना करत असतानाही पिंपरीतील राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखवलेल्या जिद्दीला सलाम! विभागाने सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात तब्बल २२ कोटी ७ लाख ८९ हजार ६३९ रुपयांचा विक्रमी महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे.

विशेष म्हणजे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरी-चिंचवड कार्यालयांतर्गत असलेल्या ‘फ’ विभागाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या विभागात भोसरी, भोसरी एमआयडीसी, दिघी, चिखली आणि निगडी यांसारख्या पाच महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीचा समावेश होतो.

अडचणी अनेक, पण कामाचा झपाटा जोरदार! अपुऱ्या कर्मचाऱ्यांनिशीही विभागाने अवैध दारू विक्रीच्या विरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला. कार्यालयाला अनेक तक्रारी प्राप्त होत असूनही, अत्यंत कमी मनुष्यबळामुळे दैनंदिन कारवायांवर मर्यादा येत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. सध्या ‘फ’ आणि ‘ई’ विभागाचे कर्मचारी एकाच ठिकाणी बसून काम करत आहेत, आणि दोन्ही विभागांकडे प्रत्येकी केवळ १० कर्मचारी कार्यरत आहेत.

तरीही, शासनाच्या आदेशाचे आणि आपल्या कर्तव्याचे योग्य पालन करत ‘फ’ विभागातील कर्मचाऱ्यांनी धाडसी पाऊले उचलली. या कारवाईत विभागाने तब्बल १ कोटी २ लाख ६९ हजार ९२३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासोबतच, एकूण ३०५ गुन्हे दाखल करत ३०३ आरोपींना कायद्याच्या कचाट्यात ओढले आहे. अनधिकृत मद्य विक्रीच्या आरोपाखाली तब्बल २० वाहने देखील ताब्यात घेण्यात आली आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवडच्या ‘फ’ विभागाने दिली आहे.

अडचणींचा डोंगर समोर असतानाही, पिंपरीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखवलेली ही दमदार कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. अपुऱ्या सोयी-सुविधांवर मात करत शासनाच्या महसुलात भरघोस वाढ करण्यात या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे