पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आत्महत्यांच्या वाढत्या घटना चिंताजनक आहेत, पण तरीही एक सकारात्मक बाब समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस, वायसीएम रुग्णालय आणि अनेक सामाजिक संघटनांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे गेल्या पावणेतीन वर्षांत तब्बल ९०० लोकांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दररोज सरासरी दोन आत्महत्या आणि एक आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना घडते. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले जाते, जिथे त्यांच्यावर तातडीने उपचार केले जातात. उपचारांसोबतच, मानसोपचार विभागातील तज्ज्ञांकडून त्यांचे समुपदेशन केले जाते, ज्यामुळे सुमारे ९० टक्के रुग्णांचे प्राण वाचले आहेत आणि त्यांना पुन्हा जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.
जानेवारी २०२३ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत, अनेक लोकांनी विविध मार्गांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये फिनाइल, कीटकनाशक आणि उंदरांचे विष प्राशन करण्याचे प्रकार अधिक आढळले. विशेषतः महिलांमध्ये फिनाइल प्राशन करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे.
नवीन कायद्यानुसार, आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा नसून मानसिक तणावाचा परिणाम मानला जातो. यामुळे लोक उपचारासाठी पुढे येत आहेत, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनजित संत्रे यांनी सांगितले. पोलिसांनीही डायल ११२ किंवा इतर हेल्पलाइनवर अशा घटनांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. या सर्व प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांचे दुःख हलके झाले असून, त्यांना एक नवीन सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































