पिंपरी-चिंचवड महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त कधी मिळणार, हा प्रश्न सध्या शहरवासीयांना भेडसावत आहे. आयुक्त शेखर सिंह यांची बदली होऊन त्यांना नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
मात्र, हर्डीकर किती काळ ही तात्पुरती जबाबदारी सांभाळणार, याबद्दल सरकारकडून कोणतेही स्पष्ट संकेत मिळत नसल्याने नागरिकांमध्ये आणि प्रशासकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बिहार विधानसभा निवडणुकांसाठी नियुक्ती झाल्यामुळे प्रशासकीय फेरबदलाचा विषय सध्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन पूर्णवेळ आयुक्तांची नियुक्ती निवडणुकीपूर्वी होणार की निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता, त्यांनीही ‘अधिकृत निर्णय झालेला नाही, दोन-तीन जणांची नावे चर्चेत आहेत,’ अशी अस्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. सध्यातरी हर्डीकर यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता
महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून विविध प्रशासकीय बदल होत असल्याने, पूर्णवेळ आयुक्तांअभावी महत्त्वपूर्ण विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता नागरिक आणि लोकप्रतिनिधी व्यक्त करत आहेत.
रोज नव्या नावांची चर्चा पालिका आणि राजकीय वर्तुळात सुरू असली तरी, राज्य शासनाच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पिंपरी-चिंचवडला लवकरच स्थिर आणि पूर्णवेळ प्रशासकीय प्रमुख मिळून प्रशासकीय संभ्रम दूर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे