‘नो एन्ट्री’ आदेश! आयुक्त शेखर सिंह यांचा मोठा निर्णय – झुले, ट्रॅम्पोलिन, फुग्यांची घरे यावर संपूर्ण बंदी

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागांमध्ये आता झुले, ट्रॅम्पोलिन, फुग्यांची घरे आणि अशा प्रकारची इतर मनोरंजन साधने लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

महापालिकेच्या जागा विविध उत्सव किंवा प्रदर्शनांसाठी भाड्याने घेतल्या जातात, जिथे लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी ही खेळणी लावली जातात. मात्र, अनेकदा निकृष्ट दर्जाची उपकरणे किंवा त्यांची अयोग्य देखभाल यामुळे अपघात घडतात आणि मुलांच्या जीवितास धोका निर्माण होतो. काही ठिकाणी ही खेळणी रस्त्यालगत लावल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होतो आणि अपघाताची शक्यता वाढते.

या निर्णयामुळे नागरिकांना सार्वजनिक जागांमध्ये चालणे, व्यायाम आणि मैदानी खेळांसाठी अधिक मोकळी जागा मिळेल. यासोबतच, अशा खेळांमुळे होणारा गोंधळ आणि रहिवाशांना होणारा त्रास थांबेल.

आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व संबंधित विभागांना आणि क्षेत्रीय कार्यालयांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले असून, सार्वजनिक जागांचा सुरक्षित व सुव्यवस्थित वापर सुनिश्चित केला जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे