Pimpri Chinchwad Teacher Salary Delay: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सुमारे तेराशे शिक्षकांचे वेतन रखडल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. महिन्याचा निम्मा भाग उलटून गेला तरी शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा न झाल्याने घरखर्च चालवायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. नियमानुसार, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला शिक्षकांचे वेतन होणे अपेक्षित असताना, प्रशासकीय दिरंगाईमुळे शिक्षकांना वेळेवर पगार मिळत नसल्याची ही मालिका कायम आहे.
एप्रिल महिना संपत आला तरी शिक्षकांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळालेले नाही. यामुळे अनेक शिक्षकांना घरभाडे, किराणा, दूध तसेच दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. बँकेचे आणि गाड्यांचे हप्ते वेळेवर भरण्याची चिंता त्यांना सतावत आहे. शिक्षकांच्या या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक संघटना प्रयत्नशील आहेत.
प्राथमिक शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष शरद लावंड यांनी सांगितले की, “आज 21 एप्रिल उजाडला तरी शिक्षकांचे वेतन झालेले नाही. नियमित वेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांची ही अवस्था आहे, तर मानधनावरील कर्मचाऱ्यांची काय स्थिती असेल याची कल्पनाही करवत नाही. शिक्षण विभागाने तातडीने शिक्षकांचे वेतन जमा करावे, यासाठी आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहोत.”
या संदर्भात महापालिकेच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “काही तांत्रिक अडचणींमुळे महापालिका शाळेतील शिक्षकांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनाला विलंब झाला आहे. अनेक शिक्षकांनी याबाबत माहिती दिली आहे. लवकरच त्यांचे वेतन जमा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.”
अखेरीस, शिक्षण विभागाने या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढून शिक्षकांना त्यांचे वेतन त्वरित द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. वेळेवर पगार न झाल्यास शिक्षकांच्या मनोबलावर आणि त्यांच्या कामावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे











































