पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीला वेग; ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक!

Pimpri Chinchwad Municipal Election 2025
३२ प्रभाग, १२८ नगरसेवक;

Pimpri Chinchwad Municipal Election 2025: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया आता गतिमान झाली आहे. नगरविकास विभागाने महत्त्वपूर्ण आदेश जारी करत, चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, ही प्रभागरचना २०११ च्या जनगणनेनुसार, म्हणजेच १७ लाख २९ हजार ६९२ लोकसंख्येवर आधारित असेल. यामुळे शहरात एकूण ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवक असतील, अशी माहिती समोर आली आहे.

महापालिकेची मुदत २२ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आल्यापासून, निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर, ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागरचना करण्याचे आदेश असल्याने, पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार नाही, असे चित्र आहे.

प्रभागरचना कशी असेल?

प्रभागरचना तयार करताना काही महत्त्वाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल. प्रभागांना क्रमांक देताना भौगोलिक सलगता आणि नैसर्गिक मर्यादा (उदा. रस्ते, नद्या, नाले, डोंगर) विचारात घेतल्या जातील. इमारती, चाळी किंवा घरांचे दोन प्रभागांमध्ये विभाजन होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. प्रभागरचना उत्तर दिशेकडून सुरू होऊन दक्षिणेत समाप्त होईल.

जनगणना न होण्याचा परिणाम;

कोरोना महामारीमुळे जनगणना होऊ शकली नाही, त्यामुळे २०११ ची लोकसंख्याच आधारभूत मानली जाणार आहे. सध्या शहरातील मतदारांची संख्या १४ लाख ८८ हजार १२९ असली तरी, मतदार नोंदणी सुरू असल्याने त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रभागरचना प्रक्रिया आणि समिती,

प्रारूप प्रभागरचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर केली जाईल. त्यावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात येतील, ज्यावर सुनावणीनंतर अंतिम प्रभागरचना निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली जाईल, ज्यात स्थानिक माहिती असलेले अधिकारी, नगररचनाकार आणि संगणकतज्ज्ञांचा समावेश असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे