पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकतींचा ‘पाऊस’ ३१८ आक्षेप दाखल

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर राजकीय वर्तुळातून जोरदार आक्षेप घेण्यात आले आहेत. पालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप रचनेवर एकूण ३१८ हरकती आणि सूचना दाखल झाल्या असून, सर्वाधिक हरकती शेवटच्या दिवशी नोंदवण्यात आल्या. यामुळे प्रभाग रचनेत मोठा राजकीय हस्तक्षेप झाल्याचे संकेत मिळत आहेत.

हरकतींमध्ये प्रामुख्याने प्रभागांच्या सीमा, लोकसंख्येची जुळणी आणि राजकीय सोयीनुसार प्रभागांचे विभाजन यावर आक्षेप घेण्यात आले आहेत. सर्वाधिक हरकती (११५) मोरवाडी, शाहूनगर आणि संभाजीनगरचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक १० मध्ये आल्या आहेत, जो राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या आणि माजी महापौर मंगला कदम यांचा प्रभाग आहे. याशिवाय, प्रभाग क्रमांक १ साठी ९८ तर संत तुकारामनगर प्रभागातून ३१ हरकती नोंदवण्यात आल्या आहेत.

या सर्व हरकतींवर पुढील आठवड्यात सुनावणी घेतली जाईल, ज्याचे नेतृत्व राज्याचे प्रधान सचिव प्रवीण दराडे करतील. १२ सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर आलेल्या सूचनांचा विचार करून १३ ते १५ सप्टेंबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचना नगरविकास विभागाला सादर केली जाईल.

अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर आयोगाकडून मान्यता मिळेल आणि ३ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत पालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करतील. या हरकतींमुळे निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.

– न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे