पिंपरी २० जून २०२३: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वादग्रस्त होर्डिंग्ज व परवाना विभागाची जबाबदारी कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळें यांच्याकडे सोपवण्यात आलीय, त्याबाबतचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी सोमवारी काढला. किवळे येथील होर्डिंग पडून ५ जणांचा नाहक मृत्यू व ३ जण गंभीर जखमी झाल्याने हा विभाग वादग्रस्त ठरला आहे.
आयुक्त सिंह यांनी उपायुक्त व सहायक आयुक्त यांच्या १३ एप्रिलला अचानक बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये उपायुक्त सचिन ढोले यांच्याकडून होर्डिंग्ज व परवाना विभागाची जबाबदारी काढून ती सहायक प्रशांत जोशी यांच्याकडे दिली. मात्र जोशी यांनी पालिकेतील काम थांबवण्याची विनंती शासनाकडे केली आणि ते पालिका सेवेतून कार्यमुक्त झाले.
त्यामुळे कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे होर्डिंग्ज व परवाना विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता, आता उपायुक्त सुभाष इंगळें यांच्याकडे होर्डिंग्ज व परवाना विभागाचा पदभार देण्यात आला तसेच त्यांच्याकडे कामगार कल्याण विभागाची देखील जबाबदारी असेल, असे सांगण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर