डासांच्या विळख्यातून पिंपरीला मुक्त करण्यासाठी महापालिकेची कठोर मोहीम; १२२ जणांना ३ लाखांचा दंड!

Pimpri Chinchwad Mosquito Control Drive
PCMC कठोर मोहीम;

Pimpri Chinchwad Mosquito Control Drive: डेंग्यू आणि मलेरियाचा वाढता धोका लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने डास प्रतिबंधक मोहीम अधिक तीव्र केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि डासांच्या उत्पत्तीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर आता कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १२२ नागरिक आणि आस्थापनांवर कारवाई करत तब्बल ३ लाख ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाने ९ लाख ५६ हजार ४१८ कंटेनर, ४४२ भंगार दुकाने आणि ६९७ बांधकाम स्थळांची कसून तपासणी केली. या तपासणीत १,२९२ ठिकाणी डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण आढळले, ज्यामुळे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. वारंवार सूचना देऊनही परिस्थिती न सुधारल्याने १२२ जणांवर थेट दंडात्मक कारवाईची कुऱ्हाड कोसळली.

या मोहिमेच्या तपशीलानुसार, एकूण १ लाख ८४ हजार १०६ घरांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ३ हजार ७९ घरांच्या परिसरात डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण आढळले. तसेच, तपासणी केलेल्या ९ लाख ५६ हजार ४१८ कंटेनरपैकी ३ हजार ४०१ कंटेनरमध्ये डास वाढण्यास अनुकूल स्थिती होती. ४४२ भंगार दुकानांमध्ये आणि ६९७ बांधकाम स्थळांवरही अस्वच्छता व पाणी साचल्याचे निदर्शनास आले

महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी यावर बोलताना सांगितले की, “घर आणि परिसरात डासांची उत्पत्ती होण्यास प्रतिबंध घालणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वारंवार सूचना देऊनही अंमलबजावणी होत नसेल, तर होणाऱ्या दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल.” पिंपरी-चिंचवडला डासमुक्त करण्याच्या या लढाईत नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे