PCMC Starts 20 Years Old Bridges Structural Audit: मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे घडलेल्या दुर्दैवी पूल दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका खडबडून जागी झाली आहे! शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत, तब्बल २० वर्षांहून अधिक वयोमान असलेल्या १७ पुलांचे तातडीने ‘Structural Audit’ (संरचनात्मक लेखापरीक्षण) करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण ४६ पूल आणि उड्डाणपूल आहेत. यापैकी २९ पूल २० वर्षांपेक्षा कमी वयाचे असून, १७ पुलांनी मात्र दोन दशकांचा टप्पा ओलांडला आहे. शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या १७ जुनाट पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. सल्लागार नियुक्ती करून निविदा प्रक्रियाही सुरू झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आले आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांवर आणि रेल्वे मार्गांवर अनेक पूल उभारले गेले आहेत. निगडी येथील महापौर मधुकर पवळे उड्डाणपूल २००४ मध्ये, तर चिंचवडमधील रेल्वे पूल १९७८ मध्ये आणि पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपूल १९८३ मध्ये उभारण्यात आला आहे. पुण्याकडून येणारा दापोडीतील ऐतिहासिक हॅरिस ब्रिज तर १८९५ साली इंग्रजांच्या काळात बांधण्यात आला होता. या हॅरिस ब्रिजसह पिंपरी आणि चिंचवड येथील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट यापूर्वीच झाले असून, आवश्यक दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत सुरू आहे.
नाशिक फाटा येथील भारतरत्न जेआरडी टाटा दुमजली उड्डाणपूल, निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकातील दुमजली उड्डाणपूल, केएसबी चौकातील दुमजली पूल यांसारखे अनेक महत्त्वाचे पूल शहरात आहेत. महापालिकेचा हा proactive निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, यामुळे शहरातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होतील अशी अपेक्षा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे












































