पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी (२२ ऑगस्ट) पीएमपीच्या निगडी आगारात ई-बस चालकांनी केलेल्या अचानक संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी चालकांनी सकाळी ५ ते दुपारी २ वाजेपर्यंत काम बंद आंदोलन केले. यामुळे ६० ई-बस जागेवरच उभ्या राहिल्या आणि पीएमपीला सुमारे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले.
निगडी आगारात ई-बस चालवण्याचे काम ‘ई-बस ट्रॅव्हल लाइन मोबिलिटी सर्व्हिसेस’ या खासगी ठेकेदाराकडे आहे.
या ठेकेदाराच्या १५० पैकी सुमारे ६० चालकांनी संप पुकारला होता. त्यांची मुख्य मागणी दैनिक पगार ६५० रुपयांवरून १,००० रुपये करणे, डबल ड्युटीचा दुप्पट पगार देणे आणि ईएसआयमध्ये कॅशलेस सेवा उपलब्ध करून देणे ही होती. यासोबतच, देखभालीअभावी बस बंद पडल्यास पूर्ण पगार, अपघातात मदत, मोफत बस प्रवास आणि चांगल्या वागणुकीचीही मागणी त्यांनी केली.
या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पीएमपीने आपल्या कायम सेवेतील चालकांना बोलावून काही बस सुरू करण्याचा प्रयत्न केला, तरीही ६० बस बंद राहिल्याने सेवेवर मोठा परिणाम झाला. अखेर, दुपारी ठेकेदार प्रतिनिधी, पीएमपी अधिकारी आणि चालक यांच्यात बैठक झाली. या बैठकीत ठेकेदाराने चालकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली, त्यानंतर चालकांनी तात्पुरता संप मागे घेतला. त्यामुळे, निगडी आगारातून १८९ बसेस पुन्हा मार्गावर धावू लागल्या, अशी माहिती पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी किशोर चौहान यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे










































