दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि कुटुंबियांसोबतचा गोडवा. मात्र, याच उत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील कर्मचारी २४ तास ‘ऑन ड्युटी‘ बजावत आहेत. सण असो वा उत्सव, कर्तव्य प्रथम मानणाऱ्या या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी अधिक गोड करण्यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला.
आयुक्तांच्या या खास पुढाकारामुळे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील तब्बल ५,१८० पोलिस कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी खरंच खूप खास झाली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला पाच किलो साखरेचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या काळात घरफोडी, चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी रात्रंदिवस गस्त घालणे, वाहतूक कोंडी सोडवणे अशा महत्त्वाच्या कामांमुळे पोलिसांना अनेकदा कुटुंबासोबत सण साजरा करणे शक्य होत नाही.
पोलिसांचे हे समर्पण लक्षात घेऊन, त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी आणि त्यांना दिवाळीचा गोडवा अनुभवता यावा, यासाठी आयुक्तांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरला आहे. या उपक्रमामुळे पोलिसांना कामातून थोडा दिलासा मिळाला असून, त्यांच्यातील उत्साहात भर पडली आहे. आयुक्तांमुळे मिळालेल्या या ‘गोड’ भेटीने ५१८० पोलिसांची दिवाळी खऱ्या अर्थाने ‘गोड’ आणि अविस्मरणीय झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































