दिल्ली बॉम्बस्फोटानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांची रडारवर ‘भाडेकरू’ मोहीम!

दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या धक्क्याने देशभर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, पिंपरी-चिंचवड पोलिसांनीही शहराची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. भाडेकरार नसलेले घरमालक आणि भाडेकरू पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

शहरभर गस्त, कसून तपासणी आणि गुप्त पडताळणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. विशेषतः दाट लोकवस्ती आणि कामगार वस्त्यांमध्ये संशयित हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कडक इशारा दिला आहे. बनावट कागदपत्रे वापरून ओळख लपवणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक घरमालक योग्य कागदपत्रांची पडताळणी न करता किंवा कायदेशीर भाडेकरार न करता घर भाड्याने देतात, ही निष्काळजी वृत्ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते.

यापूर्वीही पुणे साखळी बॉम्बस्फोटातील संशयित कासारवाडीत भाड्याने राहत असल्याचे उघड झाले होते, तसेच मोशीतील बोऱ्हाडेवस्तीतून एका संशयित युवकाला एटीएसने ताब्यात घेतले होते.

या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भाडेकरार न करता राहणाऱ्या भाडेकरूंची आणि संबंधित घरमालकांची माहिती मोठ्या प्रमाणात संकलित करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांवरही कठोर कारवाई केली आहे. आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, “घर भाड्याने देताना कायदेशीर भाडेकरार करणे आणि भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे.”

यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे, ज्याचा नागरिकांनी तातडीने लाभ घ्यावा.

सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ही मोहीम पिंपरी-चिंचवड शहराला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे