गोल पोस्ट पुणे बातम्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची हद्द आणि युनिट रचनेत मोठे फेरबदल तपास होणार अधिक वेगवान!

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची हद्द आणि युनिट रचनेत मोठे फेरबदल तपास होणार अधिक वेगवान!

प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी पोलीस आयुक्तांचा निर्णय

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या कामकाजात अधिक गती आणि सुसूत्रता आणण्यासाठी आयुक्तालयाने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. प्रशासकीय कारणास्तव, गुन्हे शाखेच्या युनिटची हद्द आणि रचनेत मोठी फेररचना करण्यात आली आहे. पूर्वी अस्तित्वात असलेल्या ५ युनिटऐवजी आता ४ नव्या आणि संतुलित युनिटमध्ये ही विभागणी करण्यात आली आहे.

काय आहे बदल?

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार ही फेररचना करण्यात आली आहे. प्रत्येक युनिटला आता निश्चित पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे मोठ्या औद्योगिक पट्ट्यातील (उदा. चाकण, भोसरी, तळेगाव) गुन्ह्यांच्या तपासात एकसंधता येणार आहे. त्याचप्रमाणे, पिंपरी, चिंचवड, सांगवी, हिंजवडी यांसारख्या नागरी भागातील गुन्ह्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणे सोपे होणार आहे. या फेरबदलामुळे ग्रामीण आणि औद्योगिक क्षेत्रातील समन्वय अधिक मजबूत होण्यास मदत होईल.

अशी आहे नवी रचना

  • युनिट – १: पिंपरी, निगडी, चिंचवड, संत तुकारामनगर, दापोडी, सांगवी.
  • युनिट – २: वाकड, हिंजवडी, काळेवाडी, बावधन, रावेत.
  • युनिट – ३: भोसरी, एमआयडीसी भोसरी, दिघी, चाकण, चाकण दक्षिण, आळंदी.
  • युनिट – ४: देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव, चिखली, उत्तर महाळुंगे.

पोलिस आयुक्तालय अंतर्गत प्रस्तावित असलेल्या चौथ्या परिमंडळाच्या अनुषंगाने ही पुनर्रचना करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सांगितले की, प्रत्येक युनिटला संतुलित जबाबदारी मिळाल्याने तपासाला अधिक गती मिळणार आहे. गुन्हेगारीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version