गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे ‘निराधार’च्या वाढीव अनुदानासाठी दिव्यांगांची धावपळ

‘निराधार’च्या वाढीव अनुदानासाठी दिव्यांगांची धावपळ

युनिक आयडीशिवाय मिळणार नाही १,००० रुपयांचा अधिकचा लाभ!

राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेत केलेल्या बदलांमुळे दिव्यांगांना मिळणाऱ्या मानधनात मोठी वाढ झाली आहे. आता हे मानधन १,५०० रुपयांवरून थेट २,५०० रुपये करण्यात आले आहे. मात्र, या वाढीव १,००० रुपयांच्या लाभासाठी आता ‘युनिक डिसॅबिलिटी आयडी‘ आणि ‘क्यूआर कोड‘ असलेले दिव्यांग प्रमाणपत्र अत्यावश्यक करण्यात आले आहे. ही महत्त्वाची कागदपत्रे नसल्यास लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळणार नसल्यामुळे, वाढीव रकमेसाठी दिव्यांगांची आता तहसील कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत धावपळ सुरू झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील काही दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात २,५०० रुपये जमा झाले आहेत, ज्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु, अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर अजूनही जुनेच १,५०० रुपये अनुदान जमा होत असल्याने त्यांच्यात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. ज्या लाभार्थ्यांकडे युनिक डिसॅबिलिटी आयडी आणि क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र आहे, त्यांनाच वाढीव रकमेचा लाभ मिळाला आहे, हे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात, हवेली तहसील कार्यालयाचे संजय गांधी योजना प्रमुख अमोल कदम यांनी माहिती दिली आहे. “ज्यांना वाढीव लाभ मिळालेला नाही, अशा वंचित लाभार्थ्यांना अतिरिक्त १,००० रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यांनी सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाकडून त्वरित ‘युनिक डिसॅबिलिटी आयडी’ प्राप्त करून त्याची कागदपत्रे तहसील कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत जमा करावीत,” अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

संजय गांधी निराधार योजना ही सामाजिक सुरक्षा योजना निराधार आणि दिव्यांगांना आर्थिक मदत पुरवते. या योजनेत वार्षिक उत्पन्न मर्यादा २१,००० रुपये असून, पात्र लाभार्थ्यांना दरमहा अनुदान दिले जाते. वाढीव अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आता दिव्यांग लाभार्थ्यांना नवीन कागदपत्रे तातडीने जमा करणे आवश्यक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version