‘पालिका आहे, ग्रामपंचायत नाही!’ चिखलीकरांचा एल्गार

खड्डेमय रस्त्यांसाठी थेट ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयावर ‘फोटो’ आंदोलन!

चिखलीकरांचा संयम आता सुटला आहे! महापालिका हद्दीत राहूनही ग्रामपंचायतीसारख्या दुर्दशा असलेल्या खड्डेमय रस्त्यांमुळे चिखली परिसरातील नागरिकांचे जीव अक्षरशः धोक्यात आले आहेत. पावसाळा संपूनही अंगणवाडी रोड आणि चिंचेचा मळा ते वाघू साने चौक या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाचे डांबरीकरण न झाल्याने गुरुवारी नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी येथील ‘‘ क्षेत्रीय कार्यालयावर अनोखे व लक्षवेधी आंदोलन केले.

फोटो दाखवले, बॅनर लावले ‘खड्डे’ घेऊन नागरिक कार्यालयात!

प्रशासकीय दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी यावेळी खड्डेमय रस्त्यांचे मोठे फोटो बॅनरवर छापून ते आपल्या अंगावर लावले होते. ‘पालिका आहे, ग्रामपंचायत नाही!‘ असा थेट सवाल विचारणारे बॅनर घेऊन नागरिकांनी ‘‘ क्षेत्रीय कार्यालयात धडक दिली. सामाजिक कार्यकर्ते यश साने यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले, “रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आता कोणतीही अडचण उरलेली नाही, तरीही काम सुरू न झाल्याने आम्ही नागरिक त्रस्त झालो आहोत. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे.”

या अनोख्या आंदोलनात यश साने, रुपेश मोरे, विनायक बनसोडे, ऋषी साने, रोशन पाणमंद, मोहन डोळ, बाळासाहेब मोरे, रमेश सांगडे, गणेश शिंदे, अशोक पवार, गणेश अवचीत, कुणाल मराठे, आकाश जाधव, प्रशांत कदम, सागर केळसकर यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. महापालिका हद्दीत मूलभूत सुविधांपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांच्या या ‘फोटो‘ आंदोलनाची शहरभर चर्चा आहे. खड्ड्यांच्या समस्येकडे महापालिका प्रशासन कधी गांभीर्याने पाहते, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे