गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पिंपरी-चिंचवड प्रभाग रचनेचा नकाशा जाहीर, उत्सुकता शिगेला; हरकतींसाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत!

पिंपरी-चिंचवड प्रभाग रचनेचा नकाशा जाहीर, उत्सुकता शिगेला; हरकतींसाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत!

पिंपरी चिंचवड महापालिकेची नवीन प्रभाग रचना जाहीर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुप्रतिक्षित प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने अखेर मान्यता दिली आहे.
प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत शहरातील सर्व 32 प्रभागांचे नकाशे महापालिका मुख्यालय आणि आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी उपलब्ध केले आहेत.
यामुळे इच्छुक उमेदवार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची कार्यालयांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

डिजिटल आणि प्रत्यक्ष पाहणीची सोय

नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील प्रभाग रचनेचे नकाशे अपलोड केले गेले आहेत.
संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर “नवीन प्रारूप प्रभाग रचना” या शीर्षकाखाली सर्व ३२ प्रभागांचे स्वतंत्र नकाशे पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.
यामुळे नागरिक घरबसल्या आपल्या प्रभागाची नवीन सीमा व रचना तपासू शकतात.

हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत

महापालिकेने या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती किंवा सूचना नोंदवण्यासाठी नागरिकांना 4 सप्टेंबर 2025 पर्यंतची मुदत दिली आहे.
यासाठी महापालिका भवनातील तळमजल्यावरील निवडणूक कार्यालयासह सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये लेखी स्वरूपात हरकती स्वीकारल्या जात आहेत.
पहिल्या दिवशी एकही हरकत नोंदवली गेली नसली, तरी पुढील काही दिवसांत सूचनांचा ओघ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागरिकांमध्ये उत्सुकता आणि राजकीय बदलाची शक्यता

नवीन प्रभाग रचनेमुळे अनेक इच्छुकांचे राजकीय भविष्य निश्चित होणार असल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
आपले जुने क्षेत्र नवीन प्रभागात समाविष्ट झाले आहे का, तसेच नवीन प्रभागांमध्ये कोणते भाग आले आहेत, हे जाणून घेण्यासाठी नागरिक नकाशांचा बारकाईने अभ्यास करत आहेत.
विशेष म्हणजे, या बदलामुळे स्थानिक राजकारणात मोठा उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version