गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पिंपरी-चिंचवड ‘पीयूसी’ आणि विमा नाही? मग पोलीस नियमांचे पालन का करत नाहीत?

पिंपरी-चिंचवड ‘पीयूसी’ आणि विमा नाही? मग पोलीस नियमांचे पालन का करत नाहीत?

पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे! वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणारेच पोलीस स्वतःच नियमांचं उल्लंघन करत असल्याचा धक्कादायक खुलासा ‘न्यूज अनकट’ च्या पाहणीत झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक पोलिसांच्या गाड्यांकडे ना वैध विमा आहे, ना ‘पीयूसी’ प्रमाणपत्र! मोटार वाहन कायद्याप्रमाणे ही गंभीर गुन्हा असून, त्यावर दंड किंवा कारावासाची तरतूद आहे. मात्र, कायद्याचे रक्षकच कायदा मोडत आहेत, ही गोष्ट नागरिकांना चांगलीच संताप आणणारी ठरली आहे.

समोर आलेल्या वाहनांच्या नंबरची यादीही चर्चेत आहे —
एमएच 14 KW 2066, एमएच 14 JM 6257, एमएच 14 ZW 8007, एमएच 14 JX 9868, एमएच 14 JO 2067, एमएच 14 JZ 2141 अशा अनेक गाड्यांचा यात समावेश आहे.

यावर नागरिकही संतप्त झाले आहेत. “आमच्याकडे एक कागदपत्र कमी असलं तरी लगेच ऑनलाइन दंड ठोकला जातो, मग पोलिसांना कोण दंड करणार?” असा थेट सवाल नागरिक संभाजी पाटील यांनी केला. तर, बळीराम खंडागळे यांनी पोलिसांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे:
“स्वतःची गाडी नियम पाळत नसताना, नागरिकांची कागदपत्रे तपासण्याचा त्यांना काय अधिकार?”

उपायुक्त विवेक पाटील यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे आता “पोलिसांच्या गाड्यांवर कारवाई होणार का? दंड कोण भरणार?” हे प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.

शहरभर एकच चर्चा रंगली आहे —
“कायद्याचे रक्षकच जर कायदा मोडत असतील, तर ‘कायदा सर्वांसाठी समान’ ही तत्व कुठे गेली?”

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version