Pimpri-Chinchwad Rain and Storm: पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी रात्री ९:१५ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या वातावरणात बदल जाणवत होता. दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले होते.
मंगळवारी सकाळपासूनच शहरात उकाडा जाणवत होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि पावसाची शक्यता वर्तवली जात होती. रात्री ९:०० च्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. सुमारे २५-३० मिनिटे पाऊस पडला. या पावसामुळे वाल्हेकरवाडी, किवळे, वाकड, हिंजवडी, थेरगाव, सांगवी, नवी सांगवी, नेहरूनगर, तळवडे, चिखली, पिंपरी, मोरवाडी, पिंपळे निलख, भोसरी, निगडी, संभाजीनगर, पिंपळे सौदागर, दापोडी, आकुर्डी, चिंचवड या भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
वादळी वाऱ्यामुळे पिंपरी आणि खराळवाडी परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. अचानक आलेल्या या पावसामुळे रात्री घरी जाणाऱ्या नोकरदार आणि कामगार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे