पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे १ लाख १२ हजार ६७८ रेशनकार्डधारकांना सध्या मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी बंधनकारक केलेली ‘ई-केवायसी’ (e-KYC) करण्याची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली आहे. यामुळे ‘ई-केवायसी‘ न केलेल्या लाभार्थींना धान्यापासून वंचित राहावे लागण्याची भीती वाढली आहे.
शहरातील ४ लाख ८९ हजार ३८७ लाभार्थ्यांपैकी मोठी संख्या अजूनही प्रलंबित आहे. पिंपरी (४३,६६६), चिंचवड (४१,७३०) आणि भोसरी (२७,२८२) या विभागांमध्ये ई-केवायसीची कामे मोठ्या प्रमाणावर बाकी आहेत. पुरवठा अधिकारी प्रदीप डंगारे यांनी माहिती दिली की, शासनाने पुढील मुदतवाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ‘ई-केवायसी‘ अपडेट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, नवीन मुदतवाढ न मिळाल्यास लाखो लाभार्थींना धान्य मिळण्यास अपात्र ठरवले जाण्याची दाट शक्यता आहे.
या गंभीर चिंतेतच, शिधापत्रिकाधारकांसाठी आणखी एक निराशाजनक बातमी आहे. गेल्या दोन वर्षांपासून सणासुदीच्या काळात मिळणारा ‘आनंदाचा शिधा’ यंदाच्या दिवाळीत बंद करण्यात आला आहे. रवा, साखर, तेल, डाळ हे जिन्नस दिवाळीत मिळणार नाहीत. ‘लाडकी बहीण’ योजनेवरील वाढलेला ताण आणि आर्थिक अडचणींमुळे सरकारने ही योजना स्थगित केल्याचे समजते.
ई-केवायसी प्रलंबित असल्याने धान्यावर टांगती तलवार आणि त्यात दिवाळीचा ‘आनंदाचा शिधा‘ बंद झाल्यामुळे शहरातील गरीब शिधापत्रिकाधारक दुहेरी संकटात सापडले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































